मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी “ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण) या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला.

*मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद…. श्री. मारुती जाधव*

*गांडूळ शेतकऱ्यांचा खरंच मित्र समजून घ्या….. श्री. विकास देशमुख*

*शेतकऱ्यांनी शेतीमधील ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज…. डॉ. शांतीकुमार पाटील* 

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी *”ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण)* या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख व्याख्याते श्री. मारुती जाधव व डॉ. एस. आर. पाटील यांच्या हस्ते शेतीसाठी उपयुक्त विद्यार्थी निर्मित विविध उत्पादनाच्या प्रदर्शनातील स्टॉलच्या उद्घाटनाने करण्यात आली. यानंतर विविध कंपनी यांनी तयार केलेली शेतीसाठी फायदेशीर अशी उत्पादने प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती. यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या फोटो पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी महाविद्यालय, कराड चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील शिवणी, आंबेगाव, अमरापूर, हिंगणगाव, सोहोली, शिवाजीनगर गावचे सरपंच, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन केले. यानंतर डॉ. विश्वजीत मोकाशी यांच्या हस्ते श्री. मारुती जाधव व श्री. विकास देशमुख यांचा स्वागत -सत्कार पुष्प वृक्ष व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान निर्मित दिनदर्शिका -२०२४ देऊन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विलास चौधरी यांनी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली; ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्विमिंग पूल, अन्न चाचणी प्रयोगशाळा, शेतकऱ्यांसाठी सर्व सोयीनियुक्त माती परीक्षण प्रयोगशाळा, प्रशस्त ग्राउंड त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक इंग्लिश स्पीकिंग लॅब, विविध ग्रंथ, चरित्रे त्याचबरोबर प्रशस्त वसतिगृह व्यवस्था आणि संकुलामार्फत संशोधन, विस्तार आधारित उपक्रम याबाबत थोडक्यात आणि आवश्यक माहिती दिली.

 प्रमुख व्याख्याते कृषी तीर्थ शेतकरी निर्मिती उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मारुती जाधव यांनी आडसाली, सुरू या उसाच्या खोडवा व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये घ्यावयाची काळजी याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. शेतीमध्ये रासायनिक खतांबरोबर जैविक खतांचाही वापर करून संवर्धित शेती याबद्दल जागृती निर्माण केली आणि उसाचे पाचट याच्या माध्यमातून जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. ऊस विषय तज्ञांनी पाचट ठेवण्यासंदर्भातील शेतकऱ्यांमधील गैरसमज जसे की वाळवीचा, उंदराचा, हुमनीचा प्रादुर्भाव याबाबत योग्य अशा उदाहरणांच्या आधारे फायदे तसेच नियंत्रणासाठी उपलब्ध पद्धतींचा शेतकऱ्यानी कटाक्षाने वापर करावा असे संबोधले. 

सन्माननीय उपस्थिती श्री. विकास देशमुख, सेंद्रिय शेतीतज्ञ यांनी शेतीमधील जैविक घटक याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृत व्हावे तसेच गांडूळ हा खरंच शेतकऱ्यांचा मित्र कसा याबाबत माहिती दिली. गांडूळाच्या माध्यमातून उभ्या पिकामध्ये जमिनीची मशागत, तन नियंत्रण, अँटिऑक्सिडंट वैशिष्ट्ये यातून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवावा आणि शेतकर्यामधील जास्त हॉर्स पॉवर ट्रॅक्टर वापरण्याच्या चढाओढ आपल्या जमिनीची अवस्था याबद्दल नाराजी व्यक्त केली.

एस. व्ही. ऍग्रो व्यवस्थापक डॉ. शांतीकुमार पाटील यांनी अशिक्षित शेती ही न परवडणारीच असेल याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले ज्यामध्ये शेतकऱ्यांनी जमीन कसत असताना महत्वाचे तंत्रज्ञान यावरती अभ्यास करून ती समजून घेणे आणि त्यावर आधारित खर्च करून सर्वाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा असे गौरोउद्गार काढले.

कृषी महाविद्यालय, कराड सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील यांनी आयोजित कार्यक्रमासाठी संस्थेच्या व्यवस्थापनाचे आभार मानून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याबाबत सांगितले.  

संस्थेचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी व उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी यांनी प्रोत्साहन दिले याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महाविद्यालयामार्फत विविध लाभदायक असे कार्यक्रमाचे नियोजनाबाबत सूचना केल्या; तसेच संचालक श्री. विलास चौधरी यांनी कार्यक्रम सर्वोत्कृष्ट पद्धतीने पार पाडावा यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन केले. यावेळी दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे, डॉ. पी. पी. पाटील, प्रा. एस. ई. जगताप, पवार मॅडम, प्रा. डी. एस. सूर्यवंशी या सर्वांनी सहकार्य केले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व कार्यक्रमासाठी आवश्यक नियोजन केले. कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागृतता  कार्यक्रम अंतर्गत विविध गावांमध्ये कार्यरत कृषीदुत व कृषीकन्या यांनी गाव पातळीवर सर्व शेतकऱ्यांना कार्यक्रमाबाबत कल्पना दिली.

कार्यक्रमाचे आभार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ए. एस. ढाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी पवार, ऋषिकेश जाधव यांनी केले तर कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. व्ही. व्ही. माने यांनी काम पाहिले.